राज्यातील वातावरणात कमालीचे बदल होत असून डिसेंबर महिन्यापासून राज्यात थंडीचा जोर वाढला आहे तर,पुणे, नाशिकसह विदर्भातही थंडीचा कडाका कायम आहे. पुण्यातील किमान तापमान 9 अंशावर आले आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांत राज्यातील किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार 19 डिसेंबर गुरुवारला राज्यात हवामान कोरडे असणार आहे. राज्यातील काही भागांत ढगाळ वातावरण राहणार आहे. मात्र, कुठलीही पावसाची शक्यता नाही. पुण्यामध्ये पुढील 24 तासांत धुक्यासह ढगाळ आकाश असणार आहे. पुण्यातील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 9 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. पुणेकरांना सध्या कडाक्याची थंडी सहन करावी लागत आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात 19 डिसेंबरला सकाळी धुके आणि नंतर मुख्यतः निरभ्र आकाश असून मुंबईतील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. मुंबईतील किमान तापमानात पुन्हा वाढ झाल्याने मुंबईकरांना सायंकाळी आणि पहाटे हलकी थंडी आणि दुपारच्या वेळी उकाडा सहन करावा लागत आहे.
तसेच, 19 डिसेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळी धुके आणि नंतर मुख्यतः निरभ्र आकाश राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील किमान तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना थंडीचा जोर थोडा कमी जाणवण्याची शक्यता आहे.
विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमध्ये 19 डिसेंबरला निरभ्र आकाश असणार आहे. गेले काही दिवस नागपूरमध्ये ढगाळ वातावरण कायम होते. त्यामुळे शेतकरी चिंतेत असल्याचे दिसून येत होते. आता नागपूरमध्ये निरभ्र आकाश असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. पुढील 24 तासांत नागपूरमध्ये कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. विदर्भात गेले काही दिवस थंडीचा जोर कायम आहे
उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये 19 डिसेंबरला मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. नाशिकमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतकं असणार आहे. नाशिकमधील किमान तापमान गेले दोन दिवस स्थिर असल्याचे दिसून येत आहे.