आई वडिलांनंतर शिक्षक हाच आपला गुरु समजला जातो. शाळेत शिक्षकाच्याच विश्वासावर पालक आपली अपत्य पाठवत असतात. पण अनेकदा हा गुरूच विद्यार्थ्यांसाठी हैवान बनल्याचे समोर आले आहे. नवी मुंबईत एका खासगी शाळेत देखील असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. शिक्षिकेने तिच्याच शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत अश्लील व्हिडिओ कॉल केल्याचा धक्कादायक प्रकार इथे घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर शिक्षिका सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवरून या अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत वारंवार चॅट करत होती. या संवादादरम्यान तिने विद्यार्थ्यासोबत अर्धनग्न अवस्थेत अश्लील व्हिडिओ कॉल केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार काही दिवस सुरू होता. मात्र, अखेर विद्यार्थ्याने याबाबतची माहिती आपल्या पालकांना दिली.
पालकांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने कोपरखैरणे पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पालकांच्या तक्रारीनुसार, शिक्षिकेच्या या वर्तनामुळे अल्पवयीन मुलाच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित शिक्षिकेला ताब्यात घेतले आणि तिच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला. याप्रकरणात अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.