मुंबई : आत्ताच एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. मुंबईच्या बोरिवली पश्चिम भागात कार लिफ्ट कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. मुंबईच्या बोरिवली पश्चिम लिंक रोड येथील एका २१ मजली इमारतीची कार लिफ्ट कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटेनेत एकाचा मृत्यू झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या बोरिवली पश्चिम भागात कार लिफ्ट कोसळल्याची दुर्घटना घडली. बोरिवली पश्चिमेकडील लिंक रोड येथील ओम प्रथमेश इमारतीची कार लिफ्ट सात फूट खाली कोसळून दुर्घटना झाल्याची घटना घडली आहे. ओम प्रथमेश ही 21 मजली इमारत असून आज शनिवारी सकाळी लिफ्ट कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
दुर्घटना घडल्यानंतर लिफ्ट खाली अडकलेल्या दोन्ही व्यक्तींना एम एच बी कॉलनी पोलीस आणि मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले आहे. त्यांना पोलिस व्हॅनमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मात्र उपचारापूर्वीच शुभम मदनलाल धुरी या 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
इमारत दुर्घटनेत गंभीर जखमी असलेल्या ४५ वर्षीय सुजीत यादव या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लिफ्ट कोसळल्याच्या घटनेची एम एच बी कॉलनी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.