मुंबईनजीकच्या विरारमध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. आईच्या हातातून बाळ सटकलं आणि बिल्डिंगच्या २१ व्या मजल्यावरून खाली पडलं. या घटनेमध्ये सहा महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
विरारच्या बोलिंज भागात बुधवारी दुपारी ही घटना घडली. खिडकी बंद करताना बाळाच्या आईचा तोल गेला आणि तिच्या हातामध्ये असलेले बाळ सटकून २१ व्या मजल्यावरून खाली पडले. या घटनेमुळे विरारमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विरार पश्चिमेला असलेल्या जॉय विले निवासी संकुलातील पिनॅकल या बिल्डिंगमध्ये ही घटना घडली. या घटनेत व्रिशांक उर्फ वेद या सात महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला. विकी सदाणे आणि पूजा सदाणे यांना लग्नाच्या सात वर्षांनंतर हे बाळ झाले होते. इतक्या वर्षानंतर बाळ झाल्यामुळे कुटुंबीय प्रचंड आनंदात होते.ही घटना घडण्याच्या एक दिवस आधी बाळाला सात महिने पूर्ण झाले होते. या घटनेमुळे सदाणे दाम्पत्यांना मोठा धक्का बसला.
पूजा सेदानी या बुधवारी दुपारी त्यांच्या बाळाला झोपवत होत्या. वेदला झोप येत नव्हती त्यामुळे पूजा यांनी त्याला कुशीत घेतलं आणि त्या फिरत फिरत बाळाला झोपवण्याचा प्रयत्न करत होत्या. बेडरुममध्ये हवा यावी यासाठी त्यांनी मास्टर बेडरुमची मोठी खिडकी देखील उघडी ठेवली होती.
याचवेळी फरशी ओली असल्यामुळे त्यांचा पाय घरला आणि त्या बाळासोबत बाल्कनीत पडल्या. यावेळी त्यांच्या हातमध्ये असलेले बाळ हे बाल्कनीतून थेट खाली पडले. २१ व्या मजल्यावरून पडल्यामुळे बाळ गंभीर जखमी झाले. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी उपचारापूर्वी त्याला मृत घोषीत केले.
ही घटना दुपारी सव्वा तीनच्या सुमारास घडली. या घटनेमुळे या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या सर्वांना मोठा धक्का बसला. बाळाचे वडील विकी सदाणे कामावर होते.
याप्रकरणी बोलिंज पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बोलिंज पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश कवळे यांनी सांगितले की, 'खिडकीला पूर्ण संरक्षक ग्रिल नव्हते. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. बोलिंज पोलिस स्टेशनमध्ये अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.'