पश्चिम रेल्वेच्या वैतरणा स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याची बाब समोर आली आहे. हा प्रकार रेल्वे प्रशासनाच्या वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला असून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या काही गाड्या पालघर स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या लोकल गाड्यांच्या वेळापत्रकारावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
मुंबईकडे येणाऱ्या अप लाईनवरील रेल्वे ट्रॅकला तडे गेल्याचं समजतेय. त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वैतरणा रेल्वे स्थानकावर काही एक्स्प्रेस गाड्या खोळंबल्या आहेत. सुदैवाने वेळीच रेल्वे रूळाला तडे गेल्याचं लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली.

रेल्वे ट्रॅक बदलण्याचं काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आलेय. यामुळे अप लाईन वरील गाड्यांचं वेळापत्रक खोळंबणार असल्याचे चित्र आहे. गुजरातकडून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या पालघर जिल्ह्यातील इतर रेल्वे स्थानकांवर थांबवण्यात आल्या आहेत.
.
मंगळवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास हा प्रकार समोर आला आहे. गुजरातवरून मुंबईकडे येणाऱ्या अप लेनवरील रेल्वे ट्रॅकला तडे गेले आहेत, त्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर देखील याचा परिणाम झाला. लोकलची वाहतूक थोड्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे.
दरम्यान, सध्या अप लेन वरील गाड्या धीम्या गतीने मुंबईच्या दिशेने सुरू आहेत . वैतरणा रेल्वे स्थानकाजवळच या रेल्वे ट्रॅकला तडा गेल्याची माहिती समोर आली असून सुदैवाने ही घटना वेळीच लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
सध्या रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले आहेत. रेल्वे ट्रॅक बदलण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे . त्यामुळे काही गाड्यांवर याचा परिणाम होणार असून गाड्या उशिरा गेल्यास चाकरमानी आणि विद्यार्थ्यांना आज पुन्हा एकदा लेट मार्क लागणार आहे.