मुंबईतील अंधेरी परिसरातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंधेरी पश्चिममधील एका शाळेत बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांसह बॉम्ब स्क्वाड शाळेत पोहोचले आहेत. बॉम्ब ठेवल्याच्या बातमीमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , मुंबईच्या ओशिवरा रायन इंटरनॅशनल ग्लोबल स्कूल या शाळेत बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली. हे कृत्य अफझल टोळीकडून करण्यात आल्याची माहिती शाळेने दिली आहे. शाळेच्या ई-मेलवर धमकी संबंधित मेल आल्याचे शाळेच्या प्रतिनिधींनी सांगितले.
बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांचे बॉम्बशोधक पथक आणि डॉग स्क्वॉड रायन इंटरनॅशनल ग्लोबल स्कूलमध्ये पोहोचले. शाळेच्या आत बॉम्ब शोधण्याचे काम सुरु आहे. शाळेत बॉम्ब आहे की नाही हे संपूर्ण तपास झाल्यानंतर कळेल असे बॉम्बशोधक पथकाने सांगितले आहे.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले आहे. बॉम्बशोधक पथक आणि डॉग स्क्वॉड शाळा आणि परिसरात बॉम्बचा शोध घेत आहे. दरम्यान या घटनेमुळे आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.