मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून राज्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे, त्याशिवाय पुणे घाट परिसरात पुढील २४ तासाकरिता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुढील २४ तासांसाठी राज्यात आयएमडीने डबल अलर्ट दिला आहे. मुसळधार पावसासोबतच समुद्रात उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील २४ तासांत महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधारेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात, घाट माथ्यावर पावसाचा जोर अधिक असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
समुद्रात उंच लाटांचा इशारा
भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने कोकण किनारपट्टीवर उंच लाटांचा इशारा जारी केला आहे. यामुळे मच्छिमारांना आणि लहान होड्यांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी पुणे घाट परिसरात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवत ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.
या पार्श्वभूमीवर, राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचा जोर वाढला आहे. कोकणातील नदीकाठ आणि डोंगराळ भागात भूस्खलनाचा धोका लक्षात घेऊन प्रवास टाळावा, असेही सुचवण्यात आले आहे.
कोणत्या ठिकाणी कोणता अलर्ट
कोकण किनारपट्टीवर पुढील आठवड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांमध्ये २१ आणि २२ जूनला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
यामुळे पूर आणि भूस्खलनाचा धोका वाढला आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्याच्या घाट परिसरातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यासाठी ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी करण्यात आले आहेत.
पुढील दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कायम राहील, तर विदर्भात तुरळक पाऊस पडेल, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.