महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली असली तरी काही जिल्ह्यांमध्ये पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान आता पावसाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. येत्या 20 ते 25 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आज कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे.
या भागाला हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मराठवाड्यापासून, कर्नाटक ते आग्नेय अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारल्याचा हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय.
हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, आजपासून राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच नाशिक, पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर जास्त राहू शकतो. तर नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या भागात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि यवतमाळ परिसरातही पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून येथेही काही भागात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना अन् नागरिकांना सतर्कतेचा इशारा हवामान तज्ज्ञांच्या मते, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामानाच्या स्थितीमुळे बाष्प वाढले आहे. त्यामुळे पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यासह अचानक पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुणे-मुंबईत ढगाळ वातावर राहू शकते असाही अंदाज आहे.