राज्यातील हवामानात कमालीचे बदल होताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेने कहर केला आहे. या उकाड्याला त्रस्त असतानाच आता पुन्हा एकदा राज्यावर अवकाळी पावसाचं संकट घोंगावतय अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
जगातील सर्वात उष्ण शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील काही शहरांचा समावेश असल्याची सुद्धा माहिती मिळाली होती. गेल्या काही दिवसांत राज्यातील तापमान हे 41 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत दरम्यान असल्याने नागरिकांना उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर 25 एप्रिल रोजी सायंकाळच्या वेळी राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता असल्याचे देखील हवामान विभागाने सांगितलेय. 25 एप्रिल रोजी राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये तापमान आणि हवामानाची स्थिती कशी असेल जाणून घेऊयात.
जळगाव, जालना, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत 25 एप्रिलला उष्ण आणि दमट वातावरण असण्याची शक्यता आहे. सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांना 25 एप्रिल साठी हीट वेव्हचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव या ठिकाणी 25 एप्रिलला संध्याकाळच्या वेळी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
मुंबईतील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी 25 एप्रिलला मुख्यतः निरभ्र आकाश असू शकते. 25 एप्रिलला पुण्यातील कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश असू शकते.