मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये काही भागांमध्ये ढगाळ वातावरण, तर कुठे चक्क लख्ख सूर्यप्रकाश पाहायला मिळत आहे. अधूनमधून दाटून येणाऱ्या काळ्याकुट्ट ढगांमुळं पावसाची एखादी जोरदार सरसुद्धा हजेरी लावून जात आहे.
राज्याच्या काही भागांमध्येसुद्धा हेच चित्र पाहाय़ला मिळत असलं तरीही घाटमाथ्यावरील भागांमध्ये मात्र पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे.
हवामान विभागानं प्राथमिक निरीक्षणाआधारे वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणाह राज्याच्या घाटमाथ्यावरील भागांमध्ये पावसाच्या सरीवर सरी बरसत आहेत आणि त्या अशाच बरसत राहतील.
ज्या कारणानं रत्नागिरी, सातारा, सांगली, पुणे आणि घाट क्षेत्रांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, विदर्भ, कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची हजेरी पाहायला मिळणार असून, तिथं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकण किनारपट्टीवर पाच दिवस मुसळधार
फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर मान्सूनने देशाच्या इतर राज्यांतही जोरदार आगेकूच सुरू ठेवली असून, रविवारी संपूर्ण देश व्यापला. दरम्यान, अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यामुळं पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचे राहणार आहेत. कोकणाला या जोरदार पावसाचा तडाखा बसेल असं सांगण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, संपूर्ण विदर्भ, रायगड, पुणे, उत्तर महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे.