गेल्या काही दिवसांत राज्यातील वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला असून अक्षरशः जीवाची लाही लाही करणार ऊन सूर्य ओकत आहर. राज्यात काही ठिकाणी पावसाने आपले दर्शन दिले असले तरी काही ठिकणी मात्र सूर्य आग ओकत असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. दरम्यान आता अमरावतीतून धक्कादायक अपडेट समोर आली आहे.
विदर्भातील तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच अमरावती जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून संपूर्ण अमरावती जिल्ह्यात सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केल्यामुळे तापमान ४५ ते ४७ अंशांच्या दरम्यान पोहोचले आहे. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उष्णतेमुळे गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात उष्माघाताचे तीन बळी गेले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
अमरावती जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची तीव्रता पाहायला मिळत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी रस्त्यांवर अघोषित संचारबंदी लागू असल्यासारखा शुकशुकाट पाहायला मिळत आहे. गेल्या ४८ तासांत अमरावतीच्या वेगवेगळ्या तीन तालुक्यांत तीन मृत्यूची नोंद झाली आहे.
अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातील काकडा येथील रहिवासी असलेले ४० वर्षीय विलास काटे यांचा तीव्र उन्हामुळे मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, अति दारू सेवन आणि त्यानंतर उन्हाचा बसलेला तीव्र फटका यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे चांदूर रेल्वे तालुक्यातील सोनेगाव या ठिकाणी एक हृदयद्रावक घटना घडली. या ठिकाणी ७० वर्षीय वृद्ध उकटराव भंडारे हे दुपारच्या सुमारास उन्हाच्या तडाख्यात सापडले. वयोमानामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी असल्याने उष्माघाताचा तीव्र झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सुकडी गुरव येथील संजीव पुसदकर यांचा बळी गेला आहे. प्रचंड उन्हाचा तडाका आणि त्यातच केलेले अति मद्यपान यामुळे त्यांचा शरीरातील पाण्याचे प्रमाण अचानक कमी होऊन मृत्यू ओढवला.