महाराष्ट्रात हवामान बदलाचा मोठा फटका बसणार असून, राज्यात 24 एप्रिलपासून उष्णतेच्या लाटेसोबतच गारपीट आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने राज्यातील 15 जिल्ह्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
भारतीय हवामान विभागानुसार, 24 एप्रिल रोजी अमरावती, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसच्या वर जाण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, विशेष कारणाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित विदर्भ आणि मराठवाडा भागांमध्ये यलो अलर्ट जाहीर करण्यात आला असून, तापमानात 2-3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
26 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता असून, 27 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, घाटमाथा, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलक्यापासून मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची दाट शक्यता असल्याने हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.