लम्पी आजराने पुन्हा एकदा डोके वर काढले असून जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुरांना लम्पी आजाराची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. यात एका गुराचा लम्पीमुळे मृत्य झाल्याची नोंद झाली असून प्रशासनाकडून लसीकरणाला सुरवात करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , जळगाव जिल्ह्यात लम्पी या विषाणूजन्य आजाराचा प्रसार वाढत चालला असून जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये गुरांवर लंम्पी आजार होताना दिसून येत आहे. तर अनेक गुरांना लंम्पीची लागण झाल्याचे दिसून येत आहे.
यावर उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने तात्काळ लसीकरणास सुरुवात करण्यात आली असली तरी लंम्पी आजारामुळे एका गुराचा मृत्यू देखील झाल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील एरंडोल, मुक्ताईनगर, पारोळा, धरणगाव, भडगाव, चोपडा, रावेर या तालुक्यातील २८ गावांमध्ये लम्पीची लागण झाल्याचे आढळून आले आहे.
यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी रोगप्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे आदेश जारी केले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्याकडून प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमनुसार आदेश काढले आहेत.
तसेच कासोदा, पारोळा, धरणगाव व रावेर येथील गुरांचे सार्वजनिक बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत.
तसेच आंतरराज्य, आंतरजिल्हा व आंतर तालुका पशु वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात यावी. फक्त लंपी प्रतिबंधक लस टोचून २८ दिवस पूर्ण झालेल्या जनावरांस वाहतुकीस प्रमाणपत्रासह परवानगी दिली जाईल. असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पशुधनाच्या आरोग्यास बाधा पोहोचू नये म्हणून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.