नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- तपोवनात होऊ घातलेल्या वृक्षतोडीच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज सकाळी तपोवन आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार तपोवनातील जुनी 1834 वृक्ष तोडणार असून नाशिक महानगरपालिकेच्या या कारवाईविरोधात राज्यात विरोध होत असून शहरात विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष, पर्यावरण प्रेमी, वृक्षप्रेमी आंदोलनात उतरले आहेत. सुमारे महिनाभरापासून हे आंदोलन चालू असून तपोवनातील एकही वृक्ष तोडला जाणार नाही यासाठी आक्रोश मोर्चा, जनआंदोलन, सह्यांची मोहीम, संगीत, कविता आदी वेगवेगळ्या मार्गाने नाशिककर लक्ष वेधून घेत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आज सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन करण्यात आले. नाशिककरांना ऑक्सिजन पुरविणार्या व त्यापेक्षाही जास्त कार्बनडाय-ऑक्साइड घातक वायू शोषून घेणार्या असंख्य जुन्या वृक्षांची कत्तल केली जाणार आहे. या घटनेचा निषेध करीत यावेळी घोषणा देऊन वृक्षतोडीला विरोध दर्शविला.
यावेळी प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, सलिम शेख, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, सुजाता डेरे, सत्यम खंडाळे, अॅड. रतनकुमार इचम, पर्यावरण सेनेचे अध्यक्ष जय शृंगारपुरे, शहर समन्वयक भाऊसाहेब निमसे ,चित्रपट सेना शहराध्यक्ष अक्षय खांडरे, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, योगेश दाभाडे, प्रसाद सानप, मराठी कलाकार अभिजीत दाते, अनिता दाते, संतोष जुळेकर, माही वाघ, मारी शिंदे, धीरज भोसले, गोकुळ नागरे, ललित वाघ, बाजीराव मते, पर्यावरण सेना शहराध्यक्ष विराज आंबेकर, निखिल गोडसे, प्रफुल बनबेरू, अर्जुन वेताळ, सचिन रोजेकर, विशाल भावले, ज्ञानेश्वर बगडे, मिलिंद कांबळे यांच्यासह मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनसे चित्रपट कर्मचारी सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष सायली संजीव या तब्येत बरी नसल्यामुळे आंदोलनात सहभागी होऊ शकल्या नाही. मात्र दोन दिवसापूर्वी त्यांनी तपोवनात जाऊन आंदोलनात सहभाग घेतला होता.
प्रभू श्रीरामाने अयोध्येसाठी एवढे कष्ट घेतले आणि राममंदिर उभारलं आणि त्या प्रभू श्रीराम नी अयोध्ये पेक्षा जिथे जास्त काळ घालवला आहे ते तपोवन तुम्ही तोडायला निघालात?
अश्या इतक्या पवित्र जागेची पवित्रता राखलीच गेली पाहिजे. एक वृक्ष तोडणं म्हणजे एक जीव घेणं. इथे तब्बल १८०० जीव घेतले जाणार आहेत. त्याच बरोबर अनेक प्राणी पक्षी देखील इथे राहतात. त्यांचं घर उध्वस्त होईल. नाशिकचं तापमान ७-८ डिग्री सेल्सियस ने वाढेल. इतकं मोठं नुकसान होणार आहे ह्या वृक्षतोडी मुळे. हैदराबाद मध्ये जे झालं ते इथे होऊ देणार नाही. नाशिक अत्यंत मोठ शहर आहे. साधुग्राम साठी अनेक एकर जागा कुठेही उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे तपोवनातील एकही वृक्ष तोडू देणार नाही.
- सायली संजीव, प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना.