संभलमध्ये जुनावई येथे भरधाव वेगात असणारी बोलेरो गाडी जनता इंटर कॉलेजच्या भिंतीवर आदळली. या दुर्दैवी अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. लग्न समारंभासारख्या आनंददायी प्रसंगावर दुखाचे सावट पसरल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे.
या घटनेत नवरदेवासह आठ जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्यामध्ये तीन चिमुकल्यांचा समावेश आहे. या अपघाता पाच जण जखमी झाले आहेत, त्यांना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार , उत्तर प्रदेशातील संभलच्या जुनावई पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भयंकर अपघात झाला. लग्नासाठी निघालेली बोलेरो गाडी कॉलेजच्या भिंतीवर जोरदारपणे आदळली. या गाडीत एकूण १४ जण होते. नवरदेवासह सर्वजण वधूला घ्यायला निघाले होते. गाडी भिंतीवर इतक्या जोरात आदळली की घटनास्थळीच नवरदेवासह पाच जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी आरडाओरड अन् किंचाळ्यांचा आवज घुमला होता.
स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. तात्काळ मदतकार्य करत अपघातामधील जखमींना रूग्णालयात दाखल केले. पण उपचारावेळी तीन जणांचा मृत्यू झाला. आणकी पाच जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच संभल पोलीस घटनास्थळी पोहोचले. तातडीने गाडीतील जखमींना बाहेर काढून सरकारी रुग्णालयात दाखल केले. यापैकी पाच जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. जुनावई पोलिसांनी सांगितले की, प्रथमदर्शनी असे दिसते की हा अपघात अतिवेगामुळे झाला आहे. तरीही, पोलीस अपघाताच्या कारणांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी सांगितले की, अपघात इतका भयंकर होता की बोलेरो गाडी भिंतीमध्ये अडकली होती. जेसीबीच्या साहाय्याने ती भिंतीतून बाहेर काढली गेली. जखमींना उपचारासाठी जुनावई सीएचसीमध्ये नेण्यात आले, जिथून पाच गंभीर जखमींना हायर सेंटरला पाठवण्यात आले. मृतांमध्ये वर, त्याची वहिनी आणि भाच्यासह तीन जण वराच्या कुटुंबातील आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पाच जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आणि पाच जण जखमी असल्याचे सांगितले. गाडीत एकूण १४ जण होते.