नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भयंकर अपघाताची घटना घडलीय. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तीन जणांवर काळाने घाला घातलाय. भरधाव कारने तिघांना चिरडले. या अपघातामध्ये तिघांचाही जागीच मृत्यू झाला. पहाटे ५ वाजताच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तावडे हॉटेल परिसरात हा भयंकर अपघात झाला. पहाटे ५ वाजताच्या सुमारास तिघेजण तावडे हॉटेल चौकात शेकोटी करून रस्त्याच्या कडेला उभे राहिले होते. त्याच वेळी अचानक भरधाव वेगात आलेल्या कारने या तिघांना चिरडलं. हा अपघात इतका भीषण होता की तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना अपघाताची माहिती दिली. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात पाठवले. तिघांच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेत आहेत. या अपघातामुळे तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.