रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अशातच नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे आज पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास भीषण अपघात झालाय. या अपघातात पिता-पुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्यांचा पुतण्या गंभीर जखमी झाला.
मिळालेल्या माहितीनुसार , नाशिक येवला तालुक्यातील नगरसुल येथील वडाचा मळा परिसरातील किशोर ओंकार सोनवणे (वय ४०), त्यांचा मुलगा ऋतिक किशोर सोनवणे (वय ११) आणि पुतण्या रवींद्र बाळू सोनवणे (वय २७) हे तिघे मोटारसायकलवर (एमएच १५ डीएफ ५२११) देवदर्शनासाठी गेले होते.
दर्शन आटोपून परतत असताना मनमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर मागून येणाऱ्या पिकअप गाडीने (एमएच १५ जीके ४३१२) त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, किशोर आणि ऋतिक यांचा जागीच मृत्यू झाला. तर रवींद्र गंभीर जखमी झाला. जखमी रवींद्रवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातानंतर पिकअप चालकाने मोटारसायकलला जवळपास चार किलोमीटरपर्यंत ओढत नेले. मालेगाव चौफुलीवर वाहतूक पोलिसांनी गाडीचा पाठलाग करून पिकअप ताब्यात घेतली, मात्र चालक फरार झाला.
अपघाताचा गुन्हा मनमाड शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून, फरार चालकाचा शोध सुरू आहे. पोलिसांनी पिकअप जप्त केली असून, पुढील तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे सोनवणे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात शोककळा पसरली असून, या घटनेने मनमाड आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.