वाहतूक कोंडीत अडकली रिक्षा अन् रिक्षातच झाली गर्भवती महिलेची प्रसूती
वाहतूक कोंडीत अडकली रिक्षा अन् रिक्षातच झाली गर्भवती महिलेची प्रसूती
img
वैष्णवी सांगळे
मनमाड : इंदूर–पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मनमाड कॅम्प परिसरात भीषण वाहतूक कोंडीत अडकलेल्या गर्भवती ऊसतोड मजूर महिलेला प्रसूतीवेदना सुरू झाल्यानंतर रिक्षाचालक व एका तरुणाच्या मदतीमुळे रिक्षामध्येच सुरक्षित प्रसूती होऊन गोंडस मुलीचा जन्म झाल्याची घटना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी घडली.

सोलापूर जिल्ह्यातील ऊसतोड कामगार कुटुंब नंदूरबारकडे जात असताना गर्भवती मजिला आवेश वडवे यांना अचानक प्रसूतीवेदना सुरू झाल्या. पतीने मनमाड येथे रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला; मात्र महामार्गावरील तीव्र वाहतूक कोंडीमुळे वाहन पुढे सरकू शकत नव्हते.

यावेळी रिक्षाचालक अमजद अत्तार यांनी तत्काळ महिलेला रिक्षामध्ये घेतले, तर सामाजिक कार्यकर्ते रितेश पगारे यांनी गर्दीतून मार्ग मोकळा करण्यासाठी पुढे चालत मदत केली. दरम्यान, कोंडीच्या मध्यभागीच रिक्षामध्ये प्रसूती होऊन मुलीचा जन्म झाला.

यानंतर आई व बाळाला मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघेही सुखरूप असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. दरम्यान, मनमाड परिसरातील महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी आपत्कालीन सेवांसाठी धोकादायक ठरत असल्याची नागरिकांची प्रतिक्रिया आहे.
manmad |
इतर बातम्या
प्रवासी

Join Whatsapp Group