मनुष्य प्राण्याचा जन्म आणि मृत्यू कधी होते आणि कसा होईल हे कोणीही सांगू शकत नाही असाच काही अनुभव प्रवाशांच्या सेवेसाठी लालपरी (परिवहन महामंडळाची एसटी बस ) असे बिद्रवाक्य घेवून त्याप्रमाणे गेल्या ६५ वर्षांपासून वाटचाल करणाऱ्या एसटी महामंडळाच्या बस आगारातील चालक आणि वाहकांना मानवतेचे दर्शन गुरुवारी घडविले.
याबाबतची माहिती अशी की, मनमाड आगाराची राजापूर-मनमाड मुक्कामी बस (नं. एमएच १४ बीटी ४४९५) सकाळी मनमाडकडे येत होती. या मार्गावर भालूर येथील रहिवासी सौ. सुनिता किशोर ढगे या बसमध्ये दवाखान्यात येण्यासाठी बसल्या. सकाळी पावणेसातच्या सुमारास सदर बस रेल्वे ओव्हरब्रिज येथे आल्यानंतर सौ. सुनिता यांना असह्य प्रसुती वेदना जाणवायला लागल्या. त्यांच्यासोबत असलेल्या ज्येष्ठ महिलांनी ही बाब चालक राहूल पवार व वाहक संजय पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. व तात्काळ बस थांबविण्याची विनंती केली.
मला माझ्या सुनेला रिक्षात बसवून दवाखान्यात न्यावे लागणार आहे. तिची प्रसुती कधीही होवू शकते असे सांगितल्यावर चालक वाहकांनी प्रसंगावधान राखून वेळेचा अपव्यय न करता राजापूर मनमाड बस थेट उपजिल्हा रूग्णालयाकडे वळविली. अवघ्या काही मिनिटांत ही बस रूग्णालयात आल्यावर आरोग्य सेविकांनी तात्काळ धावपळ करत बसमधील सौ. सुनिता यांची तपासणी केली. तेव्हा बसमध्ये त्यांची प्रसुती झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सर्व आवश्यक ते उपाययोजना करून बाळाला व आईला सुखरूप बसमध्ये उतरविले व उपजिल्हा रूग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
याचवेळी जर बस चालक वाहकांनी अर्ध्या रस्त्यात बस थांबवून रिक्षाची वाट बघितली असती तर अधिक विलंब झाला असता पण प्रसंगावधान राखल्याने व बस तात्काळ उपजिल्हा रूग्णालयात नेल्याने कोणताही अनर्थ होवू शकला नाही. याबद्दल बसमधील उपस्थित सर्व प्रवाशांनी आणि नागरीकांनी बस चालक, वाहक यांचे कौतुक केले. एस.टी.बस कर्मचाऱ्यांनी माणुसकीचे दर्शन घडविले अशा कृतीमुळेच प्रवासी बांधवांचा लाल परीवर असलेला विश्वास अढळ आहे.
चालक व वाहकाचा करण्यात आला सत्कार
धावत्या बसमध्ये प्रसुती कळा सुरू झाल्याने बाका प्रसंग उद्भवला पण चालक वाहकांनी प्रसंगावधान राखून तात्काळ राजापूर-मनमाड बस थेट मनमाड उपजिल्हा रूग्णालयात दाखल केली. आणि पुढील प्रक्रिया अतिशय सुरळीतपणे पार पडली. बाळ बाळंतिण सुखरूप असल्याने प्रवाशांसह बस चालकांनी समाधान व्यक्त केले. याबद्दल मनमाड बस आगाराचे आगारप्रमुख विक्रम नागरे यांच्याहस्ते चालक राहूल गंगाधर पवार, वाहक संजय शांताराम पवार यांचा सत्कार करण्यात आला.
चालक वाहकांनी कर्तव्याबरोबरच माणुसकी जपली
जनसामान्यांमध्ये लाल परीची विश्वासर्हता द्विगुणित केल्याबद्दल आगार व्यवस्थापक नागरे यांनी चालक, वाहक यांचा सत्कार केला. चालक वाहकांनी कर्तव्याबरोबरच माणुसकी जपली. लाल परीच्या सेवकांची तत्परता प्रवाशांनी अनुभवली. - विक्रम नागरे, आगारप्रमुख, मनमाड