मनमाड जवळ बस उलटून रस्त्याच्या कडेला पलटी; आठ प्रवासी जखमी
मनमाड जवळ बस उलटून रस्त्याच्या कडेला पलटी; आठ प्रवासी जखमी
img
दैनिक भ्रमर
मनमाड (नैवेद्या बिदरी) :- इंदोर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मनमाड नजिक असलेल्या कुंदलगाव शिवारात दुपारच्या सुमारास पुण्याहून दोंडाईचाला जाणाऱ्या बस चालकाने पावसामुळे अचानक ब्रेक मारला असता बस उलटून रस्त्याच्या कडेला पलटी झाली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बसमधील आठ प्रवाशांना दुखापत झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास शहरापासून जवळ असलेल्या कुंदलगाव शिवारात पुणे येथून दोंडाईचाला जाणारी बस क्रं एमएच १४ बीटी २३७१ हिच्यावरील वाहकाने पावसामुळे अचानक ब्रेक मारला. अचानक ब्रेक मारल्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी उलटून रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या बसमधून जवळपास २५ प्रवासी प्रवास करीत होते.यामधील आठ प्रवाशांना हाता पायाला आणि डोक्याला मार लागले असून सहा प्रवासी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून दोन प्रवासी हे खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

मात्र यातील काही प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी मालेगाव येथे हलवण्यात आले आहे. या अपघातामध्ये कमलेश पुंडलिक निकम, वय ५०, चालक, चैतन्य मनोज शर्मा वय १७ रा. नंदुरबार, शिवाजी पाटील, वय ६०, रा. कान्हेरे, शोभा रमेश भोई वय ५७, मीना मदनलाल पुरानी या वय ६० रा. अहमदनगर, मिनाबाई शिवाजी पाटील वय ५० रा. अमळनेर हे मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून दोन जखमी खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group