"या" ठिकाणी हिट अँड रन, अल्पवयीन कारचालकानं दुचाकीला उडवलं ; वडीलांविरुद्ध गुन्हा
img
Dipali Ghadwaje
छत्रपती संभाजीनगर हिट अँड रनच्या घटनेनं हादरलं आहे. अवघ्या 14 वर्षीय मुलाने वेगात गाडी चालवत स्कुटी चालकाला उडवलं. यानंतर अल्पवयीन मुलाच्या वडीलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडको एन-13 भागात हिट अँड रनची घटना घडली. या घटनेने संभाजीनगरात खळबळ उडाली आहे.

सिटी चौक पोलीस ठाण्यात अल्पवयीन चालकाच्या वडीलावर गुन्हा दाखल झाला आहे. अल्पवयीन मुलगा चालवत असलेली गाडी देखील पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. पोलीस स्वतः फिर्यादी होत रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.  

या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, कारचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. सीसीटीव्ही फुटेजनुसार, फिकट निळ्या रंगाची ह्युंदाई कार वेगात धावत आली आणि प्रथम दुभाजकावर आदळली.

त्यानंतर तिने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला जबर धडक दिली आणि पुढे विजेच्या खांबावर जाऊन धडकली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार हवेत उडून रस्त्यावर आदळला, तर त्याची दुचाकीही हवेत फेकली गेली. या घटनेदरम्यान रस्त्यावरून तीन तरुणी समोरून चालत येत होत्या. धडक दिलेली दुचाकी त्यांच्याजवळून अत्यंत थोडक्यात गेली. सुदैवाने त्या या भीषण अपघातातून बचावल्या.

कारने विजेच्या खांबाला धडक दिल्यामुळे महावितरणचा खांब वाकला आणि संपूर्ण परिसराचा वीज पुरवठा सुमारे दोन तास ठप्प झाला होता. अपघातानंतर कार काही क्षण घटनास्थळी थांबली होती.

मात्र, नागरिकांनी धाव घेताच अल्पवयीन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. दुचाकीस्वार रस्त्यावर विव्हळत पडलेला दिसून आला. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत त्याला मदत केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अपघातग्रस्त कार व चालकाचा शोध घेतला जात आहे. घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group