अपघाताची एक अतिशय दुर्दैवी घटना समोर आली आहे. कागल येथील सीमा तपासणी नाक्यासमोर हा अपघात झाला आहे. भरधाव मोटारीने मोटारसायकलला पाठीमागून ठोकरल्याने सात महिन्यांची गर्भवती कंटेनरखाली सापडून जागीच ठार झाली आहे. तर पती आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहे.
या घटनेबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, सुशीला ऊर्फ श्वेता असे महिलेचे नाव आहे तर रवींद्र खोत (वय २६, रा. हणबरवाडी- कोगनोळी, ता. निपाणी) असे त्यांच्या पतीचे नाव आहे.
सुशीला या ७ महिन्याच्या गर्भवती होत्या त्यामुळे नियमित तपासणीसाठी पतीसोबत मोटारसायकलवरून त्या कागलला जात होत्या. त्यावेळी पुणे-बंगळूर महामार्गावर येथील उपप्रादेशिक परिवहनच्या येथील सीमा तपासणी नाक्यासमोर मंगळवारी दुपारी तीनच्या दरम्यान हा अपघात झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की , हणबरवाडी कोगनोळी (ता. निपाणी) येथील रवींद्र बाळासाहेब खोत (वय ३०), पत्नी सुशीला व मुलगा विराज यांना घेऊन मोटारसायकलीवरून कागलला चालले होते. कागल येथील सीमा तपासणी नाक्यासमोर कंटेनरला ओव्हरटेक करताना पाठीमागून भरधाव आलेल्या मोटारीने खोत यांच्या मोटारसायकलला जोरात ठोकरले. या धडकेत सुशीला गाडीवरून खाली पडल्या आणि कंटेरनखाली सापडल्या. त्यांच्या डोक्यावरून कंटेनरचे पाठीमागील चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
तर रवींद्र आणि मुलगा विराज काही अंतरावर जाऊन रस्त्यावर पडले. त्यांची मोटारसायकल सुमारे ७० ते ८० फूट पुढे जाऊन रस्त्यावर पडली. अपघाताची माहिती मिळताच कागल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यावर वळविली. पंचनामा करून सुशीला यांचा मृतदेह कागलच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. सुशीला उर्फ श्वेता यांचे माहेर चिक्कोडी आहे. कागल पोलिस ठाण्यात याची नोंद आहे.
दरम्यान या अपघातानंतर कंटेनर आणि चालकाने घटनास्थळवरून पळ काढला. आरटीओ तपासणी नाक्यातील काही कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून कंटेनरला पकडले; मात्र मोटारचालक मोटारीसह पळून गेला. कागल पोलिस त्याचा शोध घेत आहेत.