१९ मे २०२४
पुणे (भ्रमर वृत्तसेवा) :- पार्टी करून घराच्या दिशेने जात असताना दुचाकीवरून जाणार्या तरुण-तरुणीला भरधाव कारने धडक दिली. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. येरवडा पोलिसांनी 17 वर्षीय कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री अडीचच्या सुमारास भरधाव कारने दुचाकीला चिरडले. विना नंबर प्लेट महागडी कार भरधाव चालवत 17 वर्षीय युवकाने दुचाकीला धडक दिली. ब्रम्हा सनसिटीमध्ये राहणार्या वेदांत अगरवालने आपल्या भरधाव कारने एका दुचाकीसह अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. या घटनेमध्ये तरुण आणि तरूणीचा जागीच मृत्यू झाला. मध्यरात्री पार्टी करून कार चालवणार्या वेदांतने मद्यधुंद अवस्थेत दोघांचा जीव घेतला.
अपघातामध्ये मृत्यू झालेले तरुण आणि तरुणी हे आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी संपल्यानंतर अडीचच्या सुमारास घरी परत जात होते. कल्याणीनगर-एअरपोर्ट रोडवर पोहचताच भरधाव वेगात आलेल्या कारने त्यांना धडक दिली. दोघेही रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडले होते. या घटनेनंतर काही तरुणांनी कारचालकाला पकडले आणि मारहाण केली.
या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारचालकाला ताब्यात घेतले आणि त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या अपघातामध्ये अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आले आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.
Copyright ©2024 Bhramar