पुण्यातील मुळशी धरणात बुडून एका तरूणाचा मृत्यू झालाय. मित्रांसोबत तो पोहण्यासाठी गेला होता, त्यावेळी तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , कृष्णा संतोष सोळंके, वय २४ वर्षे ,रा.पिंपळे सौदागर असे मुळशी धरणाच्या पाण्यात बुडून मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुमित सुनिल लांडे (वय २४, रा. केशव नगर, मुंडवा, पुणे) यांनी पौड पोलिसांना माहिती दिली.
नेमकं काय घडलं ?
कृष्णा, सुमित आणि त्यांचे काही मित्र रविवारी सकाळी फिरण्यासाठी मुळशी धरण परिसरात गेले होते. त्यावेळी पळसे येथील जलाशयात पोहण्यासाठी मित्र उतरले. पोहताना कृष्णाला पाण्याचा अंदाज आला नाही अन् तो बुडाला.
घटनास्थळाजवळच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची (एनडीआरएफ) टीम सराव करत होती. एनडीआरएफच्या जवानांनी तातडीने शोधमोहीम राबवून कृष्णाला पाण्याबाहेर काढले आणि त्याला सीपीआर दिला.
मात्र, त्याची कोणतीही हालचाल होत नव्हती. त्याला तातडीने पौड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.