पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजाराने डोके वर काढले असून आणखी एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. पुणे शहरात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असून शहरातील रुग्णसंख्या 67 पर्यंत पोहचली आहे त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे.
दरम्यान, वाढत्या रुग्ण संख्येवर पुणे महानगरपालिकेकडून नागिरकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या आजारामुळे काही जणांना पॅरालिसिसचा झटका देखील येत असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी माहितीनुसार बहुतांश जणांना अतिदक्षता विभागात हलवण्यात येणार आहे.
दरम्यान, आरोग्य विभागाने देखील सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये मुलांचा आणि तरूणांचा समावेश आहे. या वाढत्या रूग्णसंख्येनंतर रूग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अशातच आता पुण्यात भीतीचं वातावरण पहायला मिळत आहे.
गुइलेन बॅरे सिंड्रोम आजार नेमका काय?
गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मज्जातंतूवर हल्ला करते. या स्थितीचा परिणाम स्नायुंमधील कमकुवतपणा, पक्षाघात आणि गंभीर प्रकरणांमध्ये जीवघेणी गुंतागुंत होऊ शकते. दुर्मिळ असा गुइलेन बॅरे सिंड्रोम हा कोणत्याही व्यक्तीला प्रभावित करू शकतो.
काय आहेत लक्षणे ?
जीबीएस या आजाराचे पहिले लक्षण म्हणजे अशक्तपणा आणि हातपाय मुंग्या येणे. या आजाराचे कारण सध्या माहीत नाही. गुइलेन बॅरे सिंड्रोमची कारणे पूर्णपणे समजून घेणे वैद्यकीय शास्त्रासाठी अजूनही एक आव्हान आहे. पण गुइलेन बॅरे सिंड्रोमला ऑटोइम्यून डिसऑर्डर म्हणतात. गुइलेन बॅरे सिंड्रोम दोन तृतीयांश रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया किंवा लसीकरणानंतर सात दिवस ते पाच आठवड्यानंतर दिसून आले आहे. त्याचवेळी काही लोकांमध्ये हे संक्रमण ट्रिगरसारखे कार्य करते.