दैनिक भ्रमर : अनैतिक संबंधाच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. नवरा बायको तसेच पालक आणि मुलांमध्ये यामुळे वाद होताना दिसत आहे. आई आणि तिच्या प्रियकराच्या अनैतिक संबंधामुळे संतापलेल्या मुलाने आईच्या प्रियकराचा काटा काढलाय. हि घटना पुणे येथे घडली आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. दौंड तालुक्यातील बाजार तळाजवळील इंदिरानगर भागात एका अल्पवयीन मुलाने आपल्या आईच्या प्रियकराचा निर्घृणपणे हत्या केली. प्रविण दत्तात्रेय पवार (वय ३५ ) असे मृत व्यक्तीचे नाव असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १४ ऑगस्ट रोजी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास प्रविण पवार याची हत्या करण्यात आली. पवार यांचे एका विवाहितेशी अनैतिक संबंध होते. हा संपूर्ण प्रकार महिलेच्या मुलाला समजताच त्यांच्या वाद होण्यास सुरुवात झाली. अल्पवयीन मुलगा आणि प्रविण यांच्यात यामुळे अनेकदा वाद झाले होते. वारंवार सांगूनही पवार याने हे संबंध तोडले नाहीत.
घटनास्थळाच्या सुमारास, मध्यरात्री प्रविण पवार इंदिरानगर येथे आला असता पुन्हा त्याचा त्या अल्पवयीन मुलाशी वाद झाला. वाद चिघळताच संतापलेल्या मुलाने कोयता उचलला आणि पवारवर सपासप वार केले. डोक्यावर, चेहऱ्यावर, हातांवर आणि शरीरावर सलग वार झाल्याने प्रविण पवार जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. आता या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरु आहे.