
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करून जादा नफ्याचे आमिष दाखवीत एका इसमाची पावणेतीन कोटी रुपयांची एका महिलेने फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांच्या सतर्कतेने 20 लाख 44 हजार रुपये गोठविण्यात आणि दहा लाख रुपये परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की फिर्यादी इसमाला एका अनोळखी महिलेने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली होती. त्याने ती स्वीकारल्यानंतर महिलेने चॅटिंगच्या माध्यमातून त्याचा विश्वास संपादन केला. तिने त्याला क्रिप्टो करन्सीमध्ये अधिक नफा मिळत असल्याचे सांगितल्याने त्याने तिच्यावर विश्वास ठेवत 2 कोटी 78 लाख 50 हजार रुपये गुंतविले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने दि. 22 ऑगस्ट रोजी नाशिक ग्रामीणच्या पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नागेश मोहिते व त्यांच्या पथकाने या गुन्ह्यातील बँक खाते व फसवणूक करणार्या व्यक्तींची तांत्रिक माहिती घेतली. केरळमधील कोझिकोड येथील पत्त्यावर शोध घेतला असता पोलिसांनी सजा हनून (रा. वेलापलम कँडी, केरळ) व अब्दुल बासिथ थंगल (रा. पल्लिकल हाऊस, केरळ) यांना अटक केली.
फिर्यादी यांच्या फसवणूक केलेल्या रकमेपैकी पोलिसांनी दहा लाख रुपये त्यांना परत मिळवून दिले, तसेच 20 लाख 44 हजार रुपये गोठविण्यात त्यांना यश आले. न्यायालयामार्फत ही रक्कम फिर्यादी इसमाला परत करण्याची कारवाई सुरू आहे. ही कारवाई पोलीस हवालदार हेमंत गिलबिले व प्रदीप बहिरम यांनी केली असून, पुढील तपास सुरू आहे.