पु्ण्यातील घोडेगावमध्ये भरधाव बसने दुचाकीला चिरडले. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर- भीमाशंकर रस्त्यावर घोडेगाव शहराजवळ ही घटना घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , भरधाव वेगात असलेल्या खासगी बसने दुचाकीला समोरून जोरात धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीवरील तिघे जण गंभीर जखमी झाले. त्यांचा जागीच मृत्यू झाला.
उत्तर प्रदेश पासिंगची खासगी प्रवासी बस ही भीमाशंकरच्या दिशेने जात होती. तर दुचाकीवरून ३ तरूण घोडेगाववरून मंचरच्या दिशेने जात होते. घोडेगाव शहरानजीक असणाऱ्या पळसटीका फाट्यावर बस आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेनंतर बसने दुचाकीला काही अंतर फरफटत नेले. या अपघातामध्ये दुचाकीचा चक्काचूर झाला.
या भीषण अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या ३ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. हे तिन्ही तरुण आंबेगाव तालुक्याच्या कोळवाडी गावातील होते. अथर्व खमसे, गणेश असवले आणि भारत वाजे अशी या मृत तरुणांची नावं आहेत. अपघातामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले आणि त्यांनी जागीच प्राण सोडले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही तरुणांचे मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहे.
या तिन्ही तरुणांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या तरुणांच्या मृत्यूमुळे कोळवाडी गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर बसचालकाने घटनास्थळावरून पळ काढला पोलिस सध्या त्याचा शोध घेत आहेत.