साक्री-शिर्डी महामार्गावर बनोली शिवारात काल सकाळी ११ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव एसटी बस दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तीन जण जागीच ठार झाले. या अपघातात विकी दयाराम माळी (१९), रोशन दयाराम माळी (२८) या सख्ख्या भावांचा समावेश आहे तर त्यांच्यासोबतच गोविंद काळू पवार (३८) याचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे तिघे सुकडनाला परिसरात राहत होते. या अपघातामुळे मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघे जण सटाणा येथून ताहाराबादकडे दुचाकी (क्र. एम.एच.-४१-बी.एस.-४१२४) ने जात असतांना नंदुस्वार येथून बसईकडे जाणाऱ्या बस (क्र. एम. एच.१४-एल. एक्स ८८४९) ही ताहाराबाद येथून सटाण्याकडे भरधाव जात असतांना बनोली शिवारात भरधाव दुचाकी बसवर चालक बाजूने जावून धडकली.
दोन्ही वाहने वेगात असल्याने धडक बसल्यानंतर दुचाकी बसच्या पुढील चाकाजवळ घुसून काही अंतर पुढे फरफटत गेली. हा अपघात इतका भीषण होता की तिघे दुचाकीस्वार जागीच मृत्यू पावले. यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.