हृदयद्रावक ! नवविवाहित दाम्पत्याला घेऊन कुटुंब तुळजाभवानीच्या दर्शनाला निघाले , पण वाटेतच...
हृदयद्रावक ! नवविवाहित दाम्पत्याला घेऊन कुटुंब तुळजाभवानीच्या दर्शनाला निघाले , पण वाटेतच...
img
वैष्णवी सांगळे
बार्शी-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील जांभळबेट घारी शिवार पुलावर आज, १ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यावेळी मालट्रक आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत नवविवाहित दाम्पत्य मात्र सुदैवाने बचावले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

नेमकं काय घडलं ? 
कुर्डुवाडी येथील कांबळे आणि वाघमारे कुटुंबातील सदस्य एकाच कारमधून सात प्रवासी तुळजापूरच्या दर्शनासाठी निघाले होते. नवविवाहित अनिकेत गौतम कांबळे (वय २५) आणि त्यांची पत्नी मेघना अनिकेत कांबळे (वय २२) हे त्यांच्या कुटुंबासह प्रवास करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, बार्शी तालुक्यातील जांभळबेट पुलाजवळ त्यांच्या कारला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या मालट्रकने जोरदार धडक दिली. 

ही धडक इतकी भीषण होती की, कार रस्त्याच्या खाली कोसळली आणि पुलाच्या संरक्षक कठड्याअभावी ती पूर्णपणे चिरडली गेली. या अपघातात कारमधील गौतम भगवान कांबळे (६५), जया गौतम कांबळे (६०), संजय तुकाराम वाघमारे (५०), सारिका संजय वाघमारे (४५) आणि इतर एक महिला (नववधूची मावशी) अशा पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्घटनेत अनिकेत आणि मेघना कांबळे हे नवविवाहित दाम्पत्य गंभीर जखमी झाले असले तरी ते सुदैवाने बचावले आहेत. या अपघातानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. या दोन्ही जखमींना तातडीने बार्शी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. 

अपघातास कारणीभूत असलेल्या मालट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा अपघातात मृत्यू झाल्याने कुर्डुवाडी गावावर शोककळा पसरली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group