दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. आता आणखी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भीषण दुर्घटनेत तीन महिलांसह एकूण ५ जणांचा मृत्यू झालाय. भुसावळहून मलकापूरकडे येत असलेली एक भरधाव इको कार समोरील मोठ्या कंटेनर ट्रकला पाठीमागून धडकून झालेल्या भीषण दुर्घटनेत कारचालक व तीन महिलांसह एकूण ५ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
धुळे-नागपूर महामार्गावर रणथम (ता.मलकापूर) गावाजवळ मध्यरात्री हा भीषण अपघात झाला. यातील तीनही मृत महिला प्रवाशांची अद्याप ओळख पटलेली नाही.मिळालेल्या माहितीनुसार, साजीद अजीज बागवान (वय ३०, रा. भुसावळ) हा त्याच्या खासगी इको कार द्वारे चार प्रवाशांना घेऊन मलकापूर कडे येत होता. राष्ट्रीय महामार्गावर रणथम गावशिवारातील एकता हॉटेल जवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून समोरील एका मोठ्या कंटेनर ट्रकवर भरधाव कार आदळली.
यावेळी कंटेनर ट्रक पुढे निघून गेला. मोठा आवाज झाल्याने हॉटेल परिसरातील लोक अपघातस्थळाकडे धावले. त्यांनी याबाबत माहिती दिल्यानंतर दसरखेडचे पोलिस पथक तेथे पोहचले.अपघातग्रस्तांना मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत झाल्याने मृत वाहन चालकावर दसरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.