प्रवाशांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली, अपघातात १० जणांचा मृत्यू
प्रवाशांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली, अपघातात १० जणांचा मृत्यू
img
वैष्णवी सांगळे
प्रवाशांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना आंध्र प्रदेशमधील अल्लुरी सीताराम राजू या जिल्ह्यात घडली आहे. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, चित्तूर-मर्दुमल्ली महामार्गावरील घाटात खासगी बस दरीत कोसळली. चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि अनियंत्रित झालेली बस खोल दरीत कोसळली. हा अपघात झाला त्यावेळी बसमधील प्रवासी झोपलेले होते. त्यामुळे त्यांना सावध होण्यासाठी संधीही मिळाली नाही. या बसमधून एकूण ३७ प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी १० प्रवाशांचा मृत्यू झाला. तर अनेक जण गंभीर जखमी झाले.

ही बस तेलंगणातील भद्राचलम येथून अन्नावरमकडे जात होती. अपघात तुलसीपाकालु गावाजवळ झाला. या भागात अरुंद आणि वळणाचा रस्ता असल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बस दरीत कोसळल्यानंतर एकच गोंधळ उडाला. अनेक प्रवासी बसमध्ये अडकले होते. स्थानिकांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले आणि पोलिसांना माहिती दिली. चिंतूर पोलिस, बचाव पथके आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. त्यानंतर जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. 

जिल्हाधिकारी दिनेश कुमार यांनी अपघाताची माहिती देताना सांगितले की, आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू केले आणि जखमींना भद्राचलम क्षेत्र रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे.त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो. प्रशासनाकडून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. काही मृतांची ओळख पटली असून त्यांच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली ​​आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group