पुणे-पानशेत रस्त्यावर मनेरवाडी येथे भरधाव वेगात असणाऱ्या फॉर्च्युनर कारने राँग साईडला जात दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेत भाजी आणायला गेलेल्या दुचाकीस्वार वकिलाचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताप्रकरणी चारचाकी चालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , मृत वकिलाचे नाव अनिकेत भालेराव असे आहे. अनिकेत भालेराव भाजी आणायले गेले होते, पण मध्येच त्यांना काळाने गाठले.

पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. हवेली पोलिसांनी याप्रकरणी फॉर्च्युनर (एमएच १४ ई ए ००५१) च्या चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. ही घटना बुधवारी (दि. १४) संध्याकाळी साडेचारच्या सुमारास पानशेत ते पुणे रोडवर मनेरवाडी येथे तारांगण हॉटेलसमोर घडली. शांताराम भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा पुतण्या अनिकेत भालेराव हे शिवाजीनगर न्यायालयात वकिली करत होते.
बुधवारी संध्याकाळी चारच्या सुमारास ते भाजीपाला आणण्यासाठी खानापूर येथे गेले होते. साडेचारच्या सुमारास अनिकेत पानशेत ते पुणे रोडवरील तारांगण हॉटेलसमोरून जात असताना, समोरून भरधाव राँग साईडने आलेल्या फॉर्च्युनरने त्यांना समोरून जोराची धडक दिली.
यात अनिकेत गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला, दोन्ही पायांच्या गुडघ्याला तसेच डाव्या हाताला मार लागला होता. सुरूवातीला त्यांना खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शहरातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे गेल्यावर डॉक्टरांनी अनिकेत यांना मयत घोषित केले.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. अनिकेत भालेराव यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.