अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे लचके भटक्या कुत्र्यांनी तोडल्याचा धक्कादायक प्रकार सामोर आला आहे. पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत हा संतापजनक प्रकार घडला आहे. पुणे शहरातल्या मध्यवर्ती भागात आणि शहरातली सगळ्यात मोठी अशी ही स्मशानभूमी असून पुण्याच्या नवी पेठ भागात असलेल्या वैकुंठ स्मशानभूमीचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.
पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत बुधवारी सकाळी घडलेली एक घटना पुणेकरांना हादरवून टाकणारी ठरली आहे. स्मशानभूमीत अर्धवट जळलेल्या मानवी मृतदेहाचे तुकडे भटक्या कुत्र्यांनी पळवून खाल्ले असल्याचे उघडकीस आले आहे. या भयानक घटनेमुळे पुणे महापालिका प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
बुधवार 8 जानेवारीचे हे फोटो आणि व्हिडिओ आहेत. या फोटो आणि व्हिडिओमध्ये कुत्रे अर्धवट जळालेले मृतदेह खात असल्याचं दिसत आहे. पुणे महापालिकेचे माजी अधिकृत सदस्य अभिजीत बारवकर यांनी ही माहिती दिली आहे. या घटनेनंतर पुणेकरांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत आपण महापालिका आणि आरोग्य विभागाकडे तक्रार केली, पण त्यांच्याकडून कोणताही संपर्क होऊ शकला नाही, असं बारवकर म्हणाले आहेत.
दरम्यान पुणे महापालिकेने मात्र कुत्र्यांनी अर्धवट जळालेले मानवाचे मृतदेह खाल्याचं फेटाळून लावलं आहे. वैकुंठ स्मशानभूमीमध्ये जे काही झालं, त्याबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत. कुत्र्यांकडे नारळ किंवा ब्रेड आहेत, त्यांनी अर्धवट जळालेले मृतदेह पळवले नाहीत, असा खुलासा पुणे महापालिकेच्या विद्युत विभागाच्या चीफ इंजिनिअर मनिषा शेकटकर यांनी केला आहे.