पुणे रेल्वे स्थानकाबाहेर असणाऱ्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्यावर एका माथेफिरुने कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. यावेळी रेल्वे स्थानकाच्या परिसरात अनेक प्रवासी होते.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , सूरज शुक्ला नावाच्या उत्तर प्रदेशातील एका तरुणाने हे धक्कादायक कृत्य केले. त्याने हातात कोयता घेऊन पुतळ्यावर थेट हल्ला चढवला. या प्रकारामुळे रेल्वे स्थानक परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
रविवारी रात्रीच्या सुमारास हातात धारदार कोयता घेऊन केशरी रंगाचा कुर्ता परिधान केलेला सूरज शुक्ला हा तरुण पुणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर आला. त्यानंतर तो महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ गेला. त्याठिकाणी असलेल्या चौथऱ्यावर चढला आणि तो गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने वार करू लागला.
सूरज शुक्लाने महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या छातीवर आणि पायावर कोयत्याने जोरदार वार केले. यावेळी उपस्थित प्रवाशांनी घडलेला प्रकार पाहून तत्काळ रेल्वे पोलिसांना माहिती दिली.
रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सूरज शुक्ला या तरुणाला चौथऱ्यावरून खाली उतरवून ताब्यात घेतले. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्यामुळे पुतळ्याच्या डोक्यावर होणारा संभाव्य हल्ला टळला.
कोण आहे सूरज शुक्ला?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सूरज शुक्ला हा मूळचा उत्तर प्रदेशातील आहे. काही दिवसांपूर्वी तो नोकरीच्या शोधात पुण्यात आला होता. त्याने हे कृत्य नेमके कोणत्या हेतूने केले किंवा तो कोणत्या संघटनेशी संबंधित आहे का? याचा तपास पुणे रेल्वे पोलिस करत आहेत. त्याच्याशी संबंधित काही ठोस माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकारामुळे पुण्यातील नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.