"आज ती असती तर तिचा वाढदिवस साजरा झाला असता" ; वैष्णवीच्या आठवणींनी कुटुंबीय भावुक
img
DB

 पुणे  :  राज्याला हादरवून टाकणाऱ्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाला दोन महिने पूर्ण झाले आहेत. तिच्या मृत्यूने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. तिचे सासरे राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) पदाधिकारी होते. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातही तापलेले वातावरण पाहायला मिळाले होते.

प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ‘वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्येची होती’ असा दावा केल्याने या प्रकरणाने वेगळे वळण घेतले होते.

दरम्यान, काल वैष्णवीचा वाढदिवस होता. कुटुंबीयांच्या आठवणींनी आजही डोळ्यांत अश्रू आले. माध्यमांशी बोलताना वैष्णवीचे वडील भावूक होऊन म्हणाले, “आज ती असती तर तिचा वाढदिवस साजरा झाला असता. ती वाढदिवसाला घरी यायची. माझ्या लेकीला मिसळ खूप आवडायची. आजही तिच्या आठवणी ताज्या आहेत.” हे सांगताना त्यांच्या भावना आवरल्या नाहीत.

वैष्णवी जिवंत असती तर काल तिचा २३वा वाढदिवस साजरा झाला असता. तिच्या निधनानंतरही कुटुंबीयांनी तिच्या आठवणीत वाढदिवस साजरा केला.

वैष्णवीला आवडणारी मिसळ तिच्या फोटोसमोर ठेवत कुटुंबीयांनी अश्रुपूर्ण श्रद्धांजली वाहिली. तिच्या आठवणीने आजही कुटुंबीयांच्या मनातील जखम अधिक खोल झाली आहे.

 

इतर बातम्या
Join Whatsapp Group