पुण्यात वाहन वितरकांना दुचाकीची विक्री करताना ग्राहकांना दोन हेल्मेट देणे अनिवार्य असणार आहे. पुण्यासह परिसरात होणाऱ्या अपघातात होणारी जीवितहानी टाळण्यासाठी सरकारद्वारे हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने या संबंधित आदेश दिले आहेत. नवीन दुचाकी खरेदी करताना शोरुमकडून दोन हेल्मेट दिले जाणार आहेत.
याबाबतची सक्ती पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केली आहे. रस्त्यांवर वाहनांचे त्यातही दुचाकीचे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. अपघात जीवितहानी होऊ नये यासाठी हेल्मेट वापरणे आवश्यक असते. यावरुनही पुणे आरटीओने ही सक्ती केली आहे. त्यांनी यासंबंधित पत्रक देखील प्रसिद्ध केली आहे.
पुणे आरटीओच्या पत्रकामध्ये "रस्ते अपघातात दुचाकी वाहनचालकांची बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच दुचाकी अपघातामध्ये होणाऱ्या मृत्यूंची संख्या लक्षणीय आहे. दुचाकीस्वारांनी जर हेल्मेटचा वापर केला तर अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येमध्ये निश्चित घट होवू शकते.
त्यामुळे वाहनचालकाने स्वत: आणि सोबत बसलेल्या व्यक्तीने रस्ता सुरक्षा मानकांची पूर्तता करणाऱ्या हेल्मेटचा वापर करणे अत्यावश्यक आहे. तसेच केंद्रिय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम १३८ नुसार नविन दुचाकी वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना, खरेदीवेळी वाहन वितरकाने दोन हेल्मेट पुरविणे आवश्यक आहे. याबाबत दुचाकी वितरकांना सुचना देण्यात आलेल्या आहेत.
नविन दुचाकी खरेदी करणाऱ्या सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, वाहन ताब्यात घेतेवेळी वाहन वितरकाकडून दोन हेल्मेट प्राप्त करुन घ्यावीत", असे नमूद करण्यात आली आहे.
एक्स्प्रेसवेसह अन्य महामार्गांवर दुचाकीवर बसलेल्या दोघांनाही हेल्मेट घालण्याची सक्ती करण्यात आली आहे. पुणे परिवहन कार्यालयाच्या ग्राहकांना दोन हेल्मेट देण्याच्या निर्णयामुळे महामार्गावर दुचाकीस्वार हेल्मेट वापरणाऱ्यांची संख्या वाढील अशी आशा व्यक्त केली जात आहे.