पुणे : पुणे शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पीएमपीएमएलने मागील वर्षी ‘पुणे पर्यटन’ ही बससेवा सुरू केली होती. या गाडीला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून आता प्रशासनानं नव्या योजना अंमलात आणल्या आहेत.
आता 33 प्रवाशांचे ग्रुप तिकीट काढल्यास 5 प्रवाशांच्या तिकीट दरात तब्बल 100 टक्के सूट देण्यात येणार आहे. त्यानंतर संपूर्ण पुण्याचं पर्यटन मोफत करता येईल. दिवाळीत पुण्यात येणाऱ्या पाहुण्यांना पुणे दर्शन घडविण्यासाठी ही सेवा फायद्याची ठरू शकते. तसंच सुट्टीसह शनिवार आणि रविवारी देखील ही सेवा सुरू राहणार आहे. विशेष मागणी आणि बुकिंग असेल तर इतर दिवशीसुद्धा ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पीएमपीएमएलचे समन्वयक सेवक नितीन गुरव यांनी याबाबत माहिती दिली.
मार्ग : हडपसर, मोरगाव, जेजुरी, सासवड, हडपसर. (बस क्रमांक 2)
मार्ग : हडपसर, सासवड सोपानकाका मंदिर, संगमेश्वर मंदिर, नारायणपूर, बालाजी मंदिर (केतकवळे), बनेश्वर मंदिर, कोंढणपूर मंदिर, हडपसर. (बस क्रमांक 3)
मार्ग : डेक्कन, खारावडे म्हसोबा देवस्थान, टेमघर धरण, नीळकंठेश्वर पायथा, डेक्कन. (बस क्रमांक 4)
मार्ग : पुणे स्टेशन, खडकवासला धरण, पानशेत धरण, सिंहगड पायथा, पुणे स्टेशन. (बस क्रमांक 5)
मार्ग : पुणे स्टेशन, पुलगेट, हडपसर, रामदरा, थेऊर गणपती, प्रयागधाम, हडपसर, पुणे स्टेशन. (बस क्रमांक 6)
मार्ग : पुणे स्टेशन, वाघेश्वर मंदिर (वाघोली), वाडेबोल्हाई मंदिर, छ. संभाजी महाराज समाधी मंदिर (वढू बुद्रुक), रांजणगाव गणपती, भीमा कोरेगाव विजय रणस्तंभ, पुणे स्टेशन. (बस क्रमांक 7)
मार्ग : भक्त्ती शक्ती निगडी, अप्पूघर, इस्कॉन मंदिर (रावेत), मोरया गोसावी मंदिर (चिंचवड), प्रतिशिर्डी (शिरगाव), देहूगाव, गाथा मंदिर, आळंदी, भक्ती शक्ती निगडी. (बस क्रमांक 8)
मार्ग : पुणे स्टेशन-डेक्कन जिमखाना, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय, इस्कॉन मंदिर कोंढवा रोड, शिवसृष्टी आंबेगाव, स्वामी नारायण मंदिर नन्हे-आंबेगाव, पुणे स्टेशन.
33 प्रवाशांचे ग्रुप तिकीट काढल्यास 5 प्रवाशांच्या तिकीट दरात 100 टक्के सूट :
काही कारणास्तव बुकिंगच्या दिवशी बससेवा रद्द झाल्यास त्याच्या पुढच्या शनिवारी त्याच तिकिटावर प्रवास करता येईल. याशिवाय त्याच तिकिटावर तुम्हाला त्या दिवशी पर्यटन बस स्टॉपपासून तुमच्या घरापर्यंत इतर बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे, अर्थात घरापर्यंत जाणाऱ्या इतर बसमध्ये पर्यटन बसचं तिकीट प्रवासासाठी ग्राह्य धरलं जाईल. विशेष म्हणजे सर्व पर्यटन बसमध्ये खास पर्यटन मार्गदर्शक व्यक्ती उपलब्ध करण्यात येणार असून ते प्रवाशांना पर्यटनस्थळाविषयी माहिती देतील.
दरम्यान, पुण्यातील पर्यटनासाठी स्मार्ट एसी इलेक्ट्रिक बसेसची सेवा सुरू करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक बसमुळे पर्यावरणपूरक प्रवासाला चालना मिळत आहेच, शिवाय बसचा आवाज आणि डिझेलचा वास नसल्यामुळे यातून प्रवास अगदी आरामदायी होतो. वायू प्रदूषणमुक्त असा हा प्रवास असून यामुळे इंधन खर्चातही बचत होते.