पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत आयटी अभियंत्याने पोटच्या चिमुकल्याला संपवले
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत आयटी अभियंत्याने पोटच्या चिमुकल्याला संपवले
img
दैनिक भ्रमर

पुणे (भ्रमर वृत्तसेवा) :- आयटी अभियंत्याने आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा चाकूने गळा चिरून खून केला. हिम्मत माधव टिकेटी (3.5 वर्षे) असे खून झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मोठ्या गुन्ह्याच्या घटना घडत आहेत. मात्र, आता समोर आलेल्या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. पत्नीवरील चारित्र्याच्या संशयातून संतापलेल्या आयटी अभियंत्याने आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा चाकूने गळा चिरून खून केल्याची घटना समोर आली आहे. हिम्मत माधव टिकेटी असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. काल दुपारी नगररोड दर्गाच्या बाजूला पराशर सोसायटी विमानतळ परिसरातील निर्जनस्थळी मुलाचा मृतदेह आढळून आला होता, त्यानंतर परिसरात खळबळ उडाली.

आयटी अभियंता असलेला माधव साधुराव टिकेटी (38, रा. रतन प्रेस्टीज बिल्डिंग, तुकारामनगर, चंदननगर) असे खून करणाऱ्या नराधम बापाचे नाव असून, त्याला चंदनगर पोलिसांनी अटक केली आहे. तो मूळचा विशाखापट्टणम येथील राहणारा असून, 2016 पासून तो पुण्यात वास्तव्यास आहे. याबाबत स्वरूपा माधव टिकेटी (वय 30) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रात्री उशिरा मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला होता. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वरूपा ह्या चंदननगर येथे त्यांचे पती माधव, आठ वर्षाची मुलगी व तीन वर्षांच्या मुलासोबत राहण्यास आहेत. त्या गृहिणी असून, पती माधव हा आयटी कंपनीत अभियंता आहे. 

गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास स्वरूपा या घरी असताना माधव हा राहत्या घरातून मुलगी ही शाळेतून येणार असल्यामुळे तिला घेऊन येतो असे सांगून मुलगा हिम्मतलाही सोबत घेऊन गेला. परंतु, मुलीला बसमधून न घेता बाहेर निघून गेला. त्याने सोबत मुलालाही नेले. त्यानंतर ते परत माघारी आले नाही. त्यानंतर स्वरूपा यांनी माधवच्या मोबाइलवर फोन केला असता त्याने मी हिम्मतला बाहेर घेऊन सिगारेट पिण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. त्यानंतर माधव रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही तसेच मुलालाही आणून सोडले नाही. यावेळी त्याचा फोनदेखील बंद होता. तेव्हा स्वरूपा यांनी नोतवाइकांकडे व आजूबाजूस चौकशी करून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. कोठेच दोघांचा पत्ता लागत नाही हे लक्षात आल्यानंतर स्वरुपा यांनी काल रात्री साडेबाराच्या सुमारास चंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

माधव पत्नी स्वरूपाच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करताच, चंदनगर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. माधव याच्यासोबत मुलगा हिम्मत पोलिसांना सापडला नाही. त्यांनी त्याच्याकडे चौकशी केली. मात्र त्याने आपण दारू पिल्यानंतर सिगारेट ओढत असताना हडपसर येथील बस स्टँडवर तो हरवला असल्याचे सांगितले. पोलिसांना माधवच्या बोलण्यावर संशय आला. दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे, स्वाती खेडकर, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत माने, उपनिरीक्षक अजय असवले, राहुल कोळपे, पोलीस हवालदार विश्वनाथ गोणे यांच्या पथकाने माधवला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवला आणि चौकशी केली, त्यानंतर त्याच्याकडून या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळाली. मुलाचा खून करून त्याचा मृतदेह फेकून दिल्याचे सांगितले.

तपासादरम्यान पोलिसांना नराधम माधवचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले. त्यामध्ये माधव मुलगा हिंमत याला घेऊन जाताना दिसत आहे. तसेच, एका दुकानातून त्याने ब्लेड आणि चाकू खरेदी केला. त्यानंतर त्याने गुरुवारी दुपारी अडीच ते पावणेे तीनच्या सुमारास मुलगा हिंमतचा चाकूने गळा कापून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह तिथेच फेकून दिल्यानंतर लॉजवर येऊन झोपला होता.
पत्नीवरील चारित्र्याच्या संशयातून वडिलाने आपल्या साडेतीन वर्षांच्या मुलाचा चाकूने गळा चिरून खून केला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group