बायको घर सोडून माहेरी गेली, नवऱ्यानं ३ लेकरांसह स्वतःसोबत केलं असं काही की संपूर्ण परिसर हळहळला
बायको घर सोडून माहेरी गेली, नवऱ्यानं ३ लेकरांसह स्वतःसोबत केलं असं काही की संपूर्ण परिसर हळहळला
img
वैष्णवी सांगळे
उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे गावात मन सुन्न करणारी घटना घडली आहे. घरगुती वाद आणि त्यामुळे आलेल्या मानसिक तणावातून एका पित्याने स्वतःच्या तीन चिमुकल्या मुलांना विष पाजून स्वतः देखील विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे गावात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. भीमा अण्णा वाघमारे (वय 34) असे विष प्राशन केलेल्या व्यक्तीचे नाव असून, ते एका सिमेंट कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते. 



मिळालेल्या माहितीनुसार, भीमा वाघमारे आणि त्यांच्या पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरगुती कारणावरून वाद सुरू होता. या वादातून पत्नी माहेरी निघून गेली होती. नातेवाईकांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला , मात्र तिने सासरी येण्यास स्पष्ट नकार दिला. याच मानसिक तणावातून भीमा वाघमारे यांनी टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. 

भीमा वाघमारे यांनी आपल्या जानवी, प्रगती आणि बाबू या तीन लहान मुलांना वळसंगजवळील शेतात नेले. त्याठिकाणी त्यांनी तिन्ही मुलांना विष दिले आणि त्यानंतर स्वतःही विष घेतल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत भीमा वाघमारे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर तिन्ही लहान मुलांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

डॉक्टरांकडून तिन्ही मुलांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group