'माझं दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो', व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवून तरुणाने आयुष्य संपवलं, हृदयद्रावक कारण समोर
'माझं दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो', व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवून तरुणाने आयुष्य संपवलं, हृदयद्रावक कारण समोर
img
वैष्णवी सांगळे
बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातुन एक ह्दयद्रावक घटना समोर आली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथे एका 24 वर्षीय तरुणाने क्षुल्लक कारणातून आत्महत्या केली आहे. महेश उद्धव भणगे असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून मित्रांसोबत झालेल्या वादानंतर आणि वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला न बोलावल्यामुळे आलेल्या नैराश्यातून त्याने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. 

महेशने आपल्या घराच्या छतावर पाणी पिण्याच्या तांब्यात विषारी द्रव्य मिसळून प्राशन केले. दुपारी तो एकटाच छतावर झोपायला गेला होता, मात्र बराच वेळ झाला तरी तो खाली न आल्याने रात्री 8 वाजेच्या सुमारास कुटुंबीय त्याला पाहण्यासाठी घराच्या छतावर गेले. त्यावेळी तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

नेमकं काय घडलं ?
महेशचे त्याच्या काही मित्रांसोबत काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. गेल्या सोमवारी (6 एप्रिल) त्याच्या एका जवळच्या मित्राचा वाढदिवस होता. नेहमी मित्रांच्या प्रत्येक कामात आणि वाढदिवसाच्या नियोजनात पुढाकार घेणाऱ्या महेशला यावेळेस मात्र मित्रांनी बोलावले नाही. त्याला सोडून सर्व मित्रांनी वाढदिवस साजरा केल्यामुळे महेश प्रचंड मानसिक दडपणाखाली होता.

आत्महत्येपूर्वी मंगळवारी दुपारी महेशने आपल्या मोबाईलवर एक भावूक स्टेटस ठेवले होते. माझं दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलोय, अशा शब्दांत त्याने आपली व्यथा मांडली होती. या स्टेटसवरून त्याला आलेला एकटेपणा आणि खोलवर गेलेले नैराश्य स्पष्टपणे दिसून येत आहे. ज्या मित्रांसाठी त्याने नेहमी धावपळ केली, त्यांनीच शेवटच्या क्षणी साथ सोडल्याचे शल्य त्याला सहन झाले नाही.

महेश हा कुटुंबाचा आधार होता. मुलाच्या हट्टासाठी आणि त्याच्या भविष्यासाठी वडिलांनी आपली शेती विकून त्याला अंबाजोगाई शहरात कपड्याचे दुकान टाकून दिले होते. व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महेशने अशा प्रकारे अनपेक्षित एक्झिट घेतल्याने भणगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून, अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


इतर बातम्या
Join Whatsapp Group