मुंबईत माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडलीय. कुटुंबियांच्या छळाला कंटाळून नवी मुंबईतील एका महिलेने आत्महत्या केली. माहेराहून पैशाची मागणी पूर्ण होत नसल्याने महिलेला इतका अमानुष त्रास दिला की शेवटी गर्भवती महिलेला आत्महत्या सोपी वाटली.
नेमकं काय घडलं ?
मेहक शेख जी बळी पडली सासरच्या छळाची. मेहक शेख तळोजा येथे वास्तव्यास होती. मेहकच लग्न २० सप्टेंबर २०१९ रोजी इम्रान शेख सोबत मोठ्या थाटामाटात पार पडलं. मात्र लग्नाच्या काही दिवसानंतर सासरच्या मंडळीचा खरा चेहरा तिच्या समोर आला. मेहेकला पैशांसाठी मारहाण होऊ लागली. संतापजनक म्हणजे ती पाच महिन्यांची गरोदर असताना तिच्या सासरच्या मंडळींनी तिच्या पोटात लाथा मारल्या तिला गरम तेलानेही भाजले.
सप्टेंबर २०२३ मध्ये इमरानने तिला भिंतीवर ढकलले ज्यामुळे तिच्या हाताला फ्रॅक्चर झाले.वारंवार छळ सहन करूनही, कुटुंबाच्या दबावामुळे मेहक तिच्या पतीशी एक निष्ठ राहिली, असे तिच्या वडिलांनी सांगितले. शिवाय तिच्या मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी, इम्रान आणि त्याच्या बहिणींनी मेहकला आर्थिक मागण्यांवरून त्रास दिला होता. त्यांनी तिच्या पालकांकडून पैसे आणण्यासाठी तिच्यावर दबाव आणला आणि जर तिने त्याचे ऐकले नाही तर त्यांच्या मुलीला विकण्याची धमकी दिली.
या जाचाला कंटाळून ७ नोव्हेंबर रोजी मेहकने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने व्हिडिओ बनवून आपल्या कुटुंबियांना पाठवला. या व्हिडिओमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून तिने हे पाऊल उचलल्याचे तिने म्हटले. मेहेकच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे . या तक्रारीनुसार पोलिसांनी मेहेकच्या सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.