चंढीगडमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. चंढीगड सेक्टर 11 मधील सरकारी निवासस्थानी राहत असलेल्या IPS अधिकाऱ्याने आत्महत्या केली. हरियाणा कॅडरचे सीनियर आयपीएस अधिकारी वाय पूरन कुमार यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. वाय पूरन कुमार हे 2010 बॅचचे IPS अधिकारी होते.

पूरन कुमार हे हरियाणामध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक रँकचे अधिकारी होते. पोलिसांना घटनास्थळावरून एक पिस्तूल मिळाले आहे. मात्र, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आपल्या प्रामाणिकपणा आणि मेहनतीमुळे त्यांची ओळख पोलीस विभागात एक कुशल अधिकारी अशी होती.
आज दुपारी वाय. पूरण कुमार यांचा मृतदेह त्यांच्या घराच्या बेसमेंटमध्ये आढळला. सर्वप्रथम त्यांच्या मुलीने रक्ताने माखलेले शरीर पाहिले आणि तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच, चंदीगड पोलीस घटनास्थळी दाखल झाली. घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.
पूरन कुमार यांच्या पत्नी अमनीत पी कुमार या आयएएस अधिकारी आहे. सध्या त्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या शिष्टमंडळात असून जपानच्या दौऱ्यावर आहेत. अशा वेळी पूरन कुमार यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.