हैदराबादच्या हिमायतनगर भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील ४३ वर्षीय पूजा जैन या महिलेने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या आत्महत्येचं कारणही चक्रावून सोडणारं आहे.
मला देवाला भेटायचं आहे, मी बलिदान देत आहे. अशी चिठ्ठी लिहून पूजा जैन या महिलेने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तिने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना तिचा पती अरुण कुमार जैन त्याच्या ऑफिसला गेला असताना घडली.
हे ही वाचा...
गेल्या काही दिवसांपासून पूजा जैन अत्यंत धार्मिक आणि आध्यात्मिक प्रवृत्तीमध्ये गुंतलेली होती. यातूनच ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना एक सुसाईड नोट सापडली ज्यामध्ये पूजाने लिहिले होते की ती देवाला भेटण्यासाठी स्वतःचे बलिदान देत आहे.
सुसाईड नोटमध्ये तिने स्पष्ट केले की तिने पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने हे पाऊल उचलले आहे जेणेकरून ती परमेश्वराच्या जवळ जाऊ शकेल. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून चिट्ठीतील कारण बघून पोलिसही चक्रावले आहे. या प्रकरणाचा आता पोलीस बारकाईने तपास करत आहे.