
झारखंड मुक्ती मोर्चाचे (JMM) संस्थापक आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन ( ८१ वर्ष ) यांचं आज सोमवारी सकाळी निधन झालं. ते दीर्घकाळापासून आजारी होते. दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला.माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं आज सकाळी 8:48 वाजता निधन झालं.
गंगाराम रुग्णालयात नेफ्रोद डिपार्टमेंटमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना किडनीशी संबंधित समस्या होती. त्याशिवाय प्रकृतीच्या आणखी समस्या होत्या. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन वडिलांच्या निधनाची माहिती दिली.
शिबू सोरेन यांचा जन्म 11 जानेवारी 1944 ला आत्ता झारखंड आणि तेव्हा बिहारचा भाग असलेल्या हजारीबाग येथे झाला. आदिवासीच्या प्रश्नांवर त्यांनी आंदोलने केली. गुरुजी नावाने त्यांना ओळखले जात होते. आदिवासी समाजाचा बुलंद आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. निवडणुकीच्या मैदानात ते पहिल्यांदा 1977 ला उतरले होते. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला.1980 मध्ये ते लोकसभा निवडणुकीत विजयी झाले.
बिहारपासून झारखंड राज्य वेगळे निर्माण करण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेतृत्व देखील त्यांनी केले. झारखंड राज्य निर्माण होण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. ते झारखंडचे ३ वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहे. 2005, 2008, 2009 मध्ये त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला.मात्र, तीनही वेळा त्यांना आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या मंत्रिमंडळात शिबू सोरेन हे केंद्रीय मंत्री होते.