नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी आज राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. रांचीमधील मोरहाबादी मैदानात झालेल्या या शपथविधीला इंडिया आघाडीचे बडे नेतेही उपस्थित होते. यावेळी राज्यपाल संतोष गंगवार यांनी हेमंत सोरेन यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिल.
विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळवल्यानंतर हेमंत सोरेन यांनी गुरुवारी दुपारी 4 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हेमंत सोरेन यांनी चौथ्यांदा राज्याची धुरा हाती घेतली आहे. शपथविधी समारंभात जेएमएमचे राष्ट्रीय अध्यक्ष शिबू सोरेन, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कर्नाटकमधील उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, पूर्णिया येथील खासदार पप्पू यादव यांसह इंडियाचे नेते उपस्थित होते.
शपथविधी समारंभापूर्वी हेमंत सोरेन जेएमएमचे राष्ट्रीय अध्यक्ष शिबू सोरेन यांची त्यांच्या निवास्थानी भेट घेतली. येथे त्यांनी आपल्या मातापित्यांचे आशीर्वाद घेतले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर “अबुआ सरकारच्या शपथविधीपूर्वी बाबा दिशोम गुरुजी आणि आईचे आशीर्वाद घेतले.” असं त्यांनी म्हटलं आहे.
आज फक्त हेमंत सोरेन यांनी शपथ घेतली. कॅबिनेट विस्तार नंतर केला जाणार आहे. राज्यात आघाडी सरकार अस्तित्वात असताना, हेमंत सोरेन यांनी एकट्याने शपथ घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. 2019 मध्ये हेमंत सोरेन यांनी 3 मंत्र्यांसोबत शपथ घेतली होती. त्यावेळी काँग्रेसच्या कोट्यातून 2 मंत्र्यांनी त्यांच्यासोबत शपथ घेतली होती.
हेमंत सोरेन यांनी बरहेट सीटवर विधानसभा निवडणूक लढवली होती. येथे त्यांनी भाजपच्या गमलियल हेम्ब्रम यांचा 39,791 मतांनी पराभव केला. जेएमएम नेतृत्वाखालील महाआघाडीने 81 जागांपैकी 56 जागांवर विजय मिळवला तर भाजप-नेतृत्वाखालील एनडीएला 24 जागांवर विजय मिळवता आला आहे.