नाशिक : विवाहित महिलेला प्रियकर देत असलेल्या त्रासातून तिने आत्महत्या केल्याप्रकरणी व्हॅनचालकास मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे. प्रेमप्रकरणातून व्हॅनचालकाने शारीरिक व मानसिक त्रास दिल्याने ३० वर्षीय विवाहित महिलेने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. मृत महिला ही सीएची पत्नी असल्याचे समजते. उमेश गोपीनाथ भवर (वय २९, रा. सुळेवाडी, मखमलाबाद, मूळ रा. आंबे, ता. दिंडोरी, जि. नाशिक) असे अटक केलेल्या व्हॅनचालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित उमेश भवर व फिर्यादीची पत्नी यांचे सन 2023 पासून विवाह बाह्य संबंध होते, असे भवरने पोलिसांना सांगितले. मयत विवाहितेचा मुलगा त्याच्या व्हॅनने शाळेत जायचा. त्यामुळे त्यांच्यात ओळख होती. आरोपी हा फिर्यादीच्या पत्नीस गेल्या तीन महिन्यांपासून मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याचे फिर्यादीने सांगितले. त्याने फिर्यादीच्या पत्नीस पहाटे कॉल्स करण्यासह तब्बल ३० मेसेज केले आणि तिला भेटण्याचा आग्रह केला.
मात्र, विवाहित महिलेने त्यास भेटण्यास नकार दिला. तरीही, तो तिला भेटण्यास थेट तिच्या घरी आला. यामुळे विवाहित महिला ताणतणावात आली. त्रास असह्य झाल्याने तिने २५ ऑगस्ट रोजी चांडक सर्कल परिसरातील फ्लॅटमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात संशयित उमेश भवरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गोडे करीत आहेत. पोलिसांनी काल व्हॅन चालकाला अटक केली आहे.