नाशिक (प्रतिनिधी) :- नाशिकरोड येथील प्रसिद्ध डॉक्टर दाम्पत्याच्या 15 वर्षीय मुलाने हॉस्पिटलच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारल्याची घटना घडली.
अनिकेत मयूर सरोदे (वय 15, रा. गंगाजमुना अपार्टमेंट, टिळक पथ, नाशिकरोड) असे सहाव्या मजल्यावरून उडी मारलेल्या मुलाचे नाव आहे. अनिकेत हा दि. 11 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास ज्योती हॉस्पिटल येथून कुठे तरी निघून गेला होता; परंतु रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्याने नाशिकरोड येथील ज्योती हॉस्पिटलच्या सहाव्या मजल्यावरून खाली उडी मारल्याने तो गंभीर जखमी झाला.
त्याला त्याचे वडील डॉ. मयूर सरोदे यांनी अश्वकेअर हॉस्पिटल येथे औषधोपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत अनिकेतचे वडील नाशिकरोड येथील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ असून, त्याची आई प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आहे. त्याच्या वडिलांचे नाशिकरोड येथील स्टार मॉलमध्ये हॉस्पिटल आहे.
तो शहरातील एका नामांकित शाळेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होता. पुढे त्याला वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे होते. त्यासाठी तो neet ची तयारी करीत होता. अनिकेतने आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही.