नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी): वडनेर दुमाला येथे अवघ्या चार दिवसांत दुसरा साधारण चार वर्षांचा बिबट्या जेरबंद झाला. या भागात वन विभागाने तब्बल 15 पिंजरे लावले असून त्यातून जय भवानी नगर येथील बाळासाहेब अमृता जाधव यांच्या पेरूच्या बागेत लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या अडकला.
रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला वडनेर दुमाल्यातील साडेतीन वर्षांचा आयुष भगत याला दारातून बिबट्याने उचलून नेऊन त्याची हत्या केली होती. या घटनेने संपूर्ण शहर व जिल्हा हादरला होता. संतप्त ग्रामस्थ, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढत तातडीने बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती.
हे ही वाचा
वन विभागाने या परिसरात बिबट्यांचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक साधनांसह 15 पिंजरे उभारले. चार दिवसांपूर्वी एक बिबट्या पकडण्यात आला होता. मात्र अजूनही अनेक बिबटे या भागात फिरत असल्याची भीती ग्रामस्थ व माजी नगरसेवक केशव पोरजे, जगदीश पवार यांनी व्यक्त केली होती.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी बिबट्या पिंजऱ्यात अडकलेला निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला. पकडलेल्या बिबट्याला सुरक्षितरीत्या म्हसरूळ येथे हलविण्यात आले. या भागात अजून किती बिबटे आहेत आणि हल्लेखोर बिबट्या हाच का, याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे.