नाशिकरोड (प्रतिनिधी):- येथील शिंदे गावचे नाव आंतरराष्ट्रीय नकाशावर झळकले आहे. शेतीमाला लागणाऱ्या रसायनाचा कच्चा माल ठेवण्यासाठी भाड्याने घेतलेल्या गोडावून मधून नाशिकरोड पोलिसांनी सुमारे सहा कोटीचा एमडी मॅफेड्रोन जप्त केले आहे.
शिंदेगाव, एमआयडीसी येथे अमली पदार्थची तस्करी करणारा फरार आरोपी ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील याचा कारखाना मुबंईतील साकीनाका पोलिसांनी उध्वस्त केला. त्या अनुषंगाने नाशिकरोड पोलीस या भागातील बंद किंवा संशयित शेड व कारखाना असण्याची शक्यता वर्तवून प्रबोधन करीत असतांना हॉटेल मनोदयच्या शेजारी असलेल्या गोडावूनचे मालक दत्तू वामन जाधव (वय 51, रा. खरजूल मळा, जुना ओढा रोड, नाशिकरोड) यांनी नाशिकरोड पोलिसांशी संपर्क साधत संजय काळे नामक व्यक्तीने पाच हजार रुपये भाड्याने शेतीमाला लागणाऱ्या रसायनाचा कच्चा माल ठेवण्यासाठी घेतले आहे. मात्र त्या विषयी मला शंका असल्याचे कळवले.
पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड, गणेश शेळके, सुवर्णा हंडोरे व शोध पथकातील कर्मचारी यांनी सदर ठिकाणी छापा टाकून ४ किलो ८७० ग्रॅम वाजनाचे सुमारे ५ कोटी ८४ लाख ४० हजाराचे एम डी मॅफेड्रोन हा अमली पदार्थ व तो बनवण्यासाठी साठी लागणरे केमिकल असा एकूण सहा कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर ची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली.
हा कारखाना चालवणारा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. या प्रकारणाचा ललित पाटील सोबत संबंध आहे का? हा माल कुठे विकला जात होता? किती दिवसापासून येथे निर्मिती चालू होती? पोलिसांना खरच या बाबत माहिती नव्हती का? हे प्रश्न मात्र अनुत्तरीत आहेत.